(राजमुद्रा जळगाव) कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांप्रमाणेच होरपळून निघालेला लोककलावंत बेरोजगारीमुळे हैराण होत आहे. या पार्श्वभूमीवर पुढाकार घेत के. के. कॅन्स उद्योग समूहाचे उद्योगपती रजनीकांत कोठारी यांच्यावतीने सामाजिक आत्मभान जपत लोक कलावंतांसाठी किराणाचे किट खानदेश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे जिल्ह्यातील शाहीर पथक, तमाशा मंडळ, वही गायन कलापथक, वाघ्या मुरळी, वासुदेव, गोंधळी, सोंगाड्या पार्टी आदी लोककलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या लोककलावंतांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. ही निकड लक्षात घेऊन आर्थिक तथा जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर तसेच खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मदतीसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर के. के. कॅन्स उद्योग समूहाचे प्रमुख रजनीकांत कोठारी यांनी कलावंतांसाठी किराणा मालचे किट देऊ केले असून यापुढेही लोककलावंतांना जी काही मदत लागेल ती केली जाईल असे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्यासह भरारी फाऊंडेशनचे दीपक परदेशी, सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, अरविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या आर्थिक मदती संदर्भातील निवेदनानंतर जिल्हाभरातून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने लोककलावंत बऱ्याच अंशी समाधानी असल्याचे दिसून येत आहे. लोककलावंतांना आपली लोककला जिवंत ठेवण्यासाठी महत प्रयत्नांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत कलाकार जगला तरच कला जिवंत राहील या भावने अंतर्गत लोककलावंतांच्या मदतीची पाउले उचलली जात आहे.