राजमुद्रा वृत्तसेवा | रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा, हे ब्रिद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रवादी वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ सुरु करण्यात येत आहे. विविध शासकीय वैद्यकीय योजना तसेच दानशूर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक अडचणीतील गरजू रुग्णांना व अंपगांना मदत मिळवून देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबू नयेत, तसेच त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी हा कक्ष कार्यरत असेल. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे आणि खा. सुप्रिया सुळे यांचेही मार्गदर्शन या कक्षाला लाभणार आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात हा कक्ष स्थापन करण्यात येईल. राष्ट्रवादी वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मदत घेण्यासाठी राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे एन हेरेडिया मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – ४०००३८ दुरध्वनी क्र – 022 35347400 / 022 35347401 येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.