(राजमुद्रा जळगाव) दि. २९ एप्रिल रोजी बेटावद ता. जामनेर येथील कु. ह्रुदयी दिपक मोरे (वय ४ वर्ष) व कु. माही दिपक मोरे (वय ७ वर्ष) या दोघा बहिणींची कोविड तपासणी पॉझिटीव्ह आढळल्याने त्यांच्या आई सोबत उपचारासाठी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले होते.
कोविड केअर सेंटरमध्ये संवेदनशील मनाने कार्यरत असलेले डॉक्टर, नर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांनी केलेल्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत दोघी चिमुकल्या त्यांची आई शितल दिपक मोरे यांच्यासोबत उपचार घेऊन सुखरूप घरी गेल्या. दररोज सकाळी योगा करतांना चिमुकल्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे बडबड गीते, धमाल गोष्टी सांगून मनोरंजन करत होत्या. कोविड केअर सेंटर मध्ये कोणत्याही प्रकारचे मनावर दडपण न ठेवता चिमुकलीनी सर्वाची मने जिंकत आपलेसे करून घेतले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर दोघा बहिणींनी घरी जातांना सर्वांना कोरोना विरुद्धच्या लढाईची नवी उमेद देत निरोप घेतला. सर्वांना या बहिणीच्या मनमिळाऊ स्वभावाने भुरळ घातल्याने उपचार पूर्ण झाल्यावर घरी जाताना भावनिक वातावरण निर्माण झाले होते.