जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात प्रचंड गाजत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळा प्रकरणी नुकतीच मुख्य आरोपी सुनील झंवरला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात बीएचार प्रकरणात त्रयस्थ अर्जदार म्हणून ठाम असलेले. ॲड विजय भास्करराव पाटील यांनी सुनील झंवरच्या अटकेबद्दल पुन्हा एकदा आपले मत स्पष्ट केले आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून पुणे आर्थिक गुन्हे शाखा बी. एच. आर. प्रकरणातील फरार आरोपी सुनील जवळच्या मागावर होती.
ॲड विजय पाटील यांनी सुनील झंवरच्या अटकेबाबत बोलताना सांगितले की, जो व्यक्ती वीस वर्ष पहिले आरटीओ एजंट म्हणून काम करत होता तो अचानक हजारो कोटींचा मालक कसा होतो? यामागे नक्कीच गिरीश महाजन यांचा सुनील झंवरला राजाश्रय असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. सुनील झंवरच्या जवळजवळ सर्व मालमत्ता या एक प्रकारे गिरीश महाजन यांच्या असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या सर्व मालमत्तांचा आपण तपास करण्याची विनंती करणार असून गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाशिवाय हा घोटाळा शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. जर योग्य पद्धतीने या घोटाळ्याची कारवाई झाली तर यातून गिरीश महाजन यांची सुटका होणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
या घोटाळ्याबाबत बोलताना पुढे त्यांनी सांगितले की, बीएचआरचे जे सॉफ्टवेअर होते ते सॉफ्टवेअर सुनील झंवरच्या ऑफिसलाही होते. त्यामुळे या सर्व घोटाळ्यांची माहिती सुनील झंवरला होती. जितेंद्र कंडारे सोबत सेटलमेंट करून जवळजवळ हजार कोटींच्या वर मालमत्ता सुनील झंवरने घेऊन हा घोटाळा केला आहे. सुनिल झंवरने या घोटाळ्यातून गरीब जनतेची फार मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली असून आपण त्याच्या जामीन न मिळण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचेही ॲड विजय पाटील यांनी सांगितले. तसेच त्याच्या संपूर्ण प्रॉपर्टीची तपासणी करण्याचे आपण प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
सुनील झंवरला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्येच सुनील झंवर दबा धरून बसला असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना विजय पाटील यांनी सांगितले की, मुळात नाशिकचे जे पालकमंत्री होते त्यांनीच सुनील झंवरला आश्रय दिला आहे. पुढाऱ्यांना असेच लोक हवे असतात जे त्यांच्या नावावर आपली मालमत्ता घेऊन ती सांभाळून ठेवू शकतील. कारण राजकीय पुढाऱ्यांना स्वतःच्या नावावर मालमत्ता घेता येत नाही त्यामुळे त्यांना अशा ह्स्ताकांची गरज असते. त्यातून या बेनामी मालमत्ता घेऊन सुनील झंवर सारखे लोक सर्वसामान्यांची फसवणूक करत असतात असा आरोपही त्यांनी केला आहे.