जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महानगरपालिके समोरील युनियन बँकेचा (जुन्या कॉर्पोरेशन बँकेचा) आपत्कालीन सायरन अचानक वाजल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आपत्कालीन सायरन नेमका कोणत्या कारणामुळे वाजला? त्या ठिकाणी आग लागली की दरोडा पडला? हे निश्चित माहीत नसल्याने पोलीस प्रशासनही द्विधा मनस्थितीत युनियन बँकेत जवळ ठिय्या मांडून उभे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महापालिके समोरील युनियन बँकेची आपत्कालीन भयसूचक घंटा (सायरन) अचानक तांत्रिक कारणामुळे वाजू लागल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन तैनात झाले असून, सायरन नेमका कोणत्या कारणामुळे वाजला, आग लागली असावी की दरोडा पडला असावा अशा अनिश्चित कारणाने पोलिसही चक्रावले आहेत. याबाबत बँकेच्या कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात आले असून, सध्या या ठिकाणी सायरन वाजण्याच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर शहर पोलीस स्थानकातील पोलीस दल व नागरिक जमा झाले आहेत.
नुकतेच काही दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी बँकेतील सुरक्षेच्या संदर्भात बैठक घेऊन बँक अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर काही दिवसातच युनियन बँकेत निर्माण झालेल्या तांत्रिक बिघडातून आपत्कालीन सायरन वाजल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.