जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | बी एच आर घोटाळाप्रकरणी नुकतीच मुख्य संशयित फरार आरोपी सुनील झंवरला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. तपास अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या नोव्हेंबर पासून पुणे आर्थिक गुन्हे शाखा सुनील झवरच्या तपासात आपली शोध मोहीम राबवत होते. दरम्यान काल सुनील झंवरला नाशिक येथून अटक करण्यात आली. मात्र या अटकेमागे मोठी पूर्वनियोजित व्यूहरचना असल्याचे त्यांच्याच निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक नवे वळण मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.
बी एच आर प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर घोटाळा निष्पन्न झाल्यापासून फरार घोषित करण्यात आला होता. दरम्यान अचानक त्याची नाशिक येथून झालेली अटक ही पूर्वनियोजित असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. अटक झाल्यानंतर जामीन मिळण्याच्या प्रक्रियेला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी हे अटक सत्र ठरवून तयार केल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींना जामीन मंजूर झाले असल्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी शहरात बी एच आर घोटाळाप्रकरणी अटकसत्र राबवून काही संशयितांना ताब्यात घेतले होते त्यात प्रामुख्याने आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), राजेश लोढा (जामनेर), अंबादास मानकापे (औरंगाबाद), जयश्री तोतला (मुंबई), प्रेम कोगटा (जळगाव), भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव) , प्रितेश जैन (धुळे) आदींना अटक करण्यात आली होती त्यानंतर काही दिवसातच न्यायालयाने त्यांचा जामीनही मंजूर केला होता.
घोटाळा झाल्यापासून फरार असलेला सुनील झंवर नाशिक मध्ये असूनही तपास यंत्रणेला मिळून का आला नाही? नाशिक सारख्या शहरामधून तपास यंत्रणा प्रभावी असतांनाही याआधीच का सुनील झंवरला अटक केली गेली नाही? यंत्रणेची सूत्रे इतकी कमकुवत आहेत का? यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुनील झंवरच्या अचानक अटक होण्याच्या मागे मोठी विचार करून तयार केलेले नियोजन असल्याचे बोलले जात आहे.
पुढे जाऊन कायदेशीर रित्या जामीन मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये या उद्देशाने झंवर स्वतःहून गुन्हे शाखेकडे शरण झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मात्र या अटकेचे संपूर्ण श्रेय यंत्रणा घेऊन आपला प्रभाव टिकवत असल्याचेही निकटवर्तीयांनी सांगितले. याबाबत निकटवर्तीयांकडून प्रत्यक्ष जाहीर रित्या माहिती देण्याबाबत राजमुद्राने विचारले असता त्यांच्याकडून मात्र टाळाटाळ करण्यात आली आहे.