जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशत निर्माण करणाऱ्या भुसावळ शहरातील खरात टोळीच्या पाच जणांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. यात नगरसेवक राजकुमार खरात यांचा ही समावेश आहे.
भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचा भाऊ आणि त्यांची मुले अशा पाच जणांचा एकाच वेळी खून करण्यात आला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा राजकुमार खरात यांना बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून देण्यात आले होते.
दरम्यान राजकुमार खरात यांचा त्यांच्या सहकार्यांसह अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळून आल्याने पोलीस प्रशासनाने त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार केला होता. राजकुमार खरात यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून धमकी मिळत असण्याच्या ही तक्रारी आल्या आहेत.
यामध्ये टोळी प्रमुख आतिश रवींद्र खरात (वय 25), राजकुमार रवींद्र खरात (वय 27), हंसराज खरात (वय 29), राजन उर्फ गोलू खरात (वय 22) आणि अमोल उर्फ चिन्या श्याम खिल्लारे (वय 25) सर्व राहणार भुसावळ यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज जारी केले.
अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू , सहाय्यक फौजदार अनिल चौधरी, हवालदार संदीप चव्हाण, पोलीस नाईक विनोद दळवी यांनी हद्दपारी चा प्रस्ताव तयार केला असून आज त्याला मान्यता मिळाली आहे.