मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रांचने विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज कुंद्रा या प्रकरणात मुख्य आरोपी असून यापुढे एसआयटी संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात सहभागी असणाऱ्यांची संख्या वाढत चालत असल्याने क्राइम ब्रांचने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. एसीपी दर्जाचा अधिकारी या तपासाचं नेतृत्व करणार असून आतापर्यंत दाखल सर्व गुन्ह्यांचा तपास केला जाणार आहे.
नव्याने स्थापन केलेली एसआयटी पॉर्नोग्राफी प्रकरणात दाखल झालेले सर्व एफआयआर हाताळणार आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात वेगवेगळे एफआयआर, तक्रारी, अनेक पीडित आणि आरोपी असल्यानेच एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणीही आणि कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सर्व तक्रारी एसआयटीकडून हाताळल्या जाणार आहेत.
दरम्यान ७ ऑगस्टला मुंबई हायकोर्टाने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन यांनी केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला. जुलै महिन्यात दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून सुरुवातीला पोलीस कोठडीत असणारे दोघे आता न्यायालयीन कोठडीत आहेत.