राजमुद्रा वृत्तसेवा | १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची घोषणा केली आहे. पंतप्रधानांनी फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी भय स्मरण दिन’ (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून ओळखला जाईल असं सांगितलं आहे.
नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना स्थलांतरित व्हावं लागलं आणि काहींना तर आपला जीवही गमवावा लागला. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाची आठवण ठेवत १४ ऑगस्टला ‘फाळणी भय स्मरण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे”.
“हा दिवस आपल्याला भेदभाव, शत्रूत्व आणि द्वेष संपवण्यासाठी फक्त प्रेरणा देणार नाही; तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावना आणि भावना मजबूत होतील,” असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.