जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या केंद्रीय चार मंत्र्यांची उपस्थिती लाभणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले नवनिर्वाचित मंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हा भाजप ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली आहे.
यासंदर्भात भाजपाच्या वतीने नुकतेच सर्व नियोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय आरोग्य कल्याण व परिवार राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट दरम्यान, केंद्रीय पंचायत राज मंत्री राज्यमंत्री कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट या काळात, तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यात्रा १६ ते २१ ऑगस्ट या काळात, तसेच केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची यात्रा १९ ते २५ ऑगस्ट या काळात निघणार आहे.
डॉ. भारती पवार यांचा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील पाच लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटर एवढा प्रवास असणार आहे. १६ ऑगस्ट रोजी पालघर येथून सकाळी दहा वाजता जन आशीर्वाद यात्रेस सुरुवात होणार आहे. या यात्रेत हे चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. तसेच केंद्र सरकारच्या योजनांचा लाभार्थ्यांची संवाद साधणार आहेत.
यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते जयकुमार रावल, खा. खासदार डॉ. हिना गावित, खा. सुभाष भामरे, आ. विजयकुमार गावित, आ. डॉ. राहुल अहिरे, आ. दिलीप बोरसे, आ.काशीराम पावरा, आ.राजेंद्र पाडवी, आ. अमरिशभाई पटेल, एन. जे. गावित, प्रकाश गेडाम यांचा या यात्रेत सहभाग असणार आहे.