पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंचावर उपस्थित ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या सौंदर्याचं वर्णन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल आहे. ‘या वयातही आशाताई काय दिसतात ना…!’ असं राज म्हणाले. राज ठाकरे यांच्या विधानानंतर ते स्वत:ही हसले आणि उपस्थितांमध्येही हशा पिकला.
शिवशाहिर बाबासाहेब पुरंदेर हे १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्याच निमित्ताने पुण्यात खास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खुद्द बाबासाहेब पुरंदरे, राज ठाकरे, आशा भोसले, आशिष शेलार, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरे यांनी दिलखुलास भाषण करताना आशा भोसले यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं तर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे उत्तुंग पैलू सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, कोण म्हणेल आशाताई ८८ वर्षांच्या आहेत…. या वयातही काय दिसतात ना… अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरु होती… मी म्हटलं आपण जाहीरपणे सांगावं, असं मिश्किलपणे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे, आशाताई इथे मंचावर बसलेत… आपण फक्त यांच्या वयाचे आकडे मोजायचे…याच्यापलीकडे आपल्या हातात काही नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
“सहा वर्षांचा असताना मी पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं. त्याच्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना फक्त पाहत होतो, वाचत होतो… आता मला त्यांच्या सहवास लाभला… बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले तरी ते वर्तमानात भानावर यायला शिकवतात… इतिहासात ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करु नये हे सांगतात…”
“इतिहासाबरोबर वर्तमानची जाग आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात… बाबासाहेबांची इतिहास सांगायची एक पद्धत आहे… ते तुम्हाला समजेल, रुचेल अश्या पद्धतीने बाबासाहेब इतिहास सांगतात… दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही…
शिवचरित्र अनेकांनी लिहिली… पण बाबासाहेबांनी ते घराघरात, मनामनात पोहोचवलं… बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा… आमची नातवंड, पतवंडं तुमच्याकडून असाच इतिहास ऐकत राहतील”, अशी इच्छा व्यक्त करुन राज ठाकरे बाबासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.