जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | बीएचआर प्रकरणात आपला कुठलाही संबंध नाही. सुनील झंवर यांच्यासोबत माझा १०० रुपयाचा सुद्धा व्यवहार नाही. यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेला पत्र लिहिणार असल्याचे स्पष्टीकरण आ. मंगेश चव्हाण यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केले. जळगाव येथे भाजप कार्यालय वसंत स्मृती तेथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सुनील झंवर यांच्या कार्यालयात आ. मंगेश चव्हाण यांच्या संबंधित कागदपत्रे मिळवून आली होती. त्यामध्ये चव्हाण यांच्या निवडणुक काळात दोन कोटी खर्च देण्यात आल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. त्या पार्श्वभूमीवर आयोजित या पत्रकार परिषदेत बोलताना आ. मंगेश चव्हाण म्हणाले, सरकार व पोलिसांनी योग्य तो तपास करून कार्यवाही करावी. ठराविक लोकांना बीएचआर मध्ये अडकवण्यात येत आहे. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत, असेही चव्हाण म्हणाले. तसेच कारण नसताना आपली बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने हे षड्यंत्र रचण्यात आले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे हे दोन कोटीचे कर्ज २०१२ मध्ये घेतले होते, मात्र त्याची २०१४ मध्ये परतफेड झाली आहे असे चव्हाण यांनी सांगितले.
सध्या राज्यात बीएचआर प्रकरणाचा घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. पोलीस तपासात अनेकांची नावे उघडकीस येत आहेत. आपल्यावर ज्यावेळी बीएचआर चे कर्ज होते ते कोणतेही बेकायदेशीर व्यवहार न करता परतफेड करण्यात आली असल्याचे मंगेश चव्हाण यांनी सांगितले.