जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | “सध्याचे सरकार कसे सत्तेत आले, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला व त्यात तुमच्या गुलाबरावचा उत्तर महाराष्ट्रातून दुसऱ्यांदा मंत्री म्हणून समावेश झाला. योगायोगाने जळगाव जिल्ह्यात पाण्याचेच खाते येते. एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोघांकडे जलसंपदा खाते तर माझ्याकडे पाणीपुरवठा! ते चारीने देत होते, मी पाईपने थेट घरोघरी पोहोचवतो!” असे वक्तव्य करत पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्कील चिमटे काढले.
जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथे ९५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कासोदा हे प्रेम करणारे गाव असून या परिसरानेच आपल्याला मोठे केले, असे कृतज्ञापूर्वक उद्गार गुलाबराव यांनी काढले. मात्र, त्यांनी भाषणाच्या ओघात अप्रत्यक्षरित्या कासोदा परिसराकडे दुर्लक्ष आणि कार्यक्षमतेबद्दल शिवसेनेचेच आमदार चिमणराव पाटील यांना टोलाही लगावला. “गेली अनेक वर्षे कासोदा परिसर पाणी-पाणी करतोय. शेवटी आपणच १६ गावांचा पाणीपुरवठा योजनेत समावेश करून घेतला,” असे सांगत गुलाबरावांनी या परिसराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे श्रेय स्वतःकडे घेतले.
याप्रसंगी चिमणराव पाटील म्हणाले, “जोपर्यंत कोणत्याही पाणीपुरवठा योजनेला शाश्वत (कायमस्वरूपी) स्त्रोत मिळत नाही, तोपर्यंत पाणी पुरवठा योजना चालणार नाही. जर अंजनी धरण भरले नाही तर कोट्यवधी रुपये खर्च करूनही कासोदा गावाला पाणी मिळणार नाही. त्यासाठी अंजनी धरणावरून स्त्रोत बदलून गिरणातून पाणी लिफ्टिंग कराव लागेल. तसे केले तरच ही योजना उत्तमप्रकारे चालेल.
गुलाबराव पाटील यांच्यासोबत असलेल्या गैरसमजाबाबत बोलतांना चिमणराव म्हणाले, पालकमंत्री व माझ्या संबंधांत काही गैरसमज होते. मतभेद हे नातेसंबंधामध्येच होतात; परंतु आम्ही दोघे एकमेकांचे शत्रू नाहीत. आमचे दोघांचे जमत नाही, असा गैरसमज आता कुणी करुन घेऊ नये. आमचे आता चांगले जमते.