कट्ट्यावरची चर्चा
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | “खबरदार..! जर गुलाबराव पाटील यांच्या नादात लागाल तर, भुसावळातच काय शहरातही दिसू देणार नाही..!” असा इशारा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. भुसावळ येथील प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या प्रभागात विविध विकास कामांचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याने जिल्ह्यातील राजकारणाला पुन्हा मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी आपल्या खड्या आवाजात इशारा देताना कोणाचेही नाव न घेता विरोधकांवर जोरदार टीकाबाजी केली. ‘समाजात काही प्रवृत्ती अशा आहेत ज्या मुख्याधिकाऱ्यांना ही त्रास देतात. कुणी स्वतःला मोठे डाकू समजत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही’, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘आमच्या नादाला लागाल तर याद राखा. संबंधितांनी आमच्या नादी लागू नये, कारण समाजात त्यांनी काय केले, काय केले नाही, याचा सर्व लेखाजोखा आमच्या खिशात आहे. याची जाणीवही त्यांनी करून दिली. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री काय आहे ते दाखवले नाही. परंतु ज्या दिवशी पालकमंत्री काय चीज आहे हे दाखवेल त्याच वेळी हे लोक समाजात आणि भुसावळ शहरात दिसणार नाहीत, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी संजय सावकारे यांच्या कार्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला. संजय सावकारे यांनी तालुक्यासाठी विविध विकास गंगा वाहून आणली. त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. याची जाणीव देखील पाटलांनी आपल्या भाषणातून उपस्थित लोकांना करून दिली.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी या सार्वजनिक कार्यक्रमात कोणाचेही नाव न घेता विरोधकांवर टीका टिप्पणी केली. भुसावळ शहरात वाढलेली गुन्हेगारी ही चिंतेची बाब आहे. परंतु यापुढे भुसावळातील गुन्हेगारी अजिबात खपवून घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. शहरातील काही गुन्हेगारांना हद्दपार करणे बाबत आपण पोलिस अधीक्षकांशी चर्चा केलेली आहे. ते लवकरच कार्यवाही करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आ. संजय सावकारे यांच्यावर स्तुतीसुमने उधळतांना गुलाबराव पाटील म्हणाले, त्यांच्यामुळे तालुक्यातील जनतेला काहीही त्रास नाही. सामाजिक, शैक्षणिक विकासाभिमुख कार्य ते करीत असतात, याची जाणीव देखील जाणीव देखील त्यांनी करून दिली. शिवसेनेचे मुलुख मैदान तोफ म्हणून गुलाबराव पाटील यांची ख्याती राज्यात शिवसैनिकांना माहित आहे. याची एक झलक त्यांनी या कार्यक्रमात विरोधकांना दाखवून दिली. त्यामुळे भुसावळ तालुक्यातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे.