मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भागतसिह कोश्यारी यांना आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन जोरदार टोला हाणला आहे. “मी राज्यपालांचं विधान ऐकलं. ते म्हणाले सरकार मागणी करत नाही तर तुम्ही का विचारताय. पण पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल”, असा टोला शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला आहे. मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
स्वातंत्र्यदिनी पुण्यात काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत विचारलं. या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा, असंही ते म्हणाले. त्यावर राज्यपालांनी रणपिसे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. त्यावेळी ‘अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे मित्रं आहेत. ते इथेच आहेत. सरकार याबाबत आग्रह धरत नाहीत. तुम्ही का आग्रह धरता?, असा सवाल राज्यपालांनी केला. या विषयावर राज्य सरकारने पाटपुरावा केला पाहिजे’, असं त्यांनी रणपिसेंना सांगितलं.
याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना विचारलं असता पवारांनीही राज्यपालांना टोला लगावत जोरदार उत्तर दिलं आहे. मी राज्यपालांचं विधान ऐकलं. ते म्हणाले सरकार मागणी करत नाही तुम्ही का विचारताय. मात्र, पत्र गेलेलं आहे. वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल. त्यांनी आधी पत्र दिलं, त्यानंतर शिष्टमंडळही भेटून आलं. आपल्याकडे म्हण आहे शहाण्यांना शब्दाचा मार, अशा शब्दात पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोला हाणला.
सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींच्या आरक्षणाबाबत एक निर्णय दिला आहे. त्यानंतर केंद्र सरकारनं घटनादुरुस्ती केली. पण ही ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे. जोपर्यंत 50 टक्के आरक्षण मर्यादा दूर केली जात नाही तोपर्यंत आरक्षणाचा घोळ कायम राहील. काही राज्यात ६० टक्क्यांच्यावर आरक्षण आहे. जेवणाचं निमंत्रण दिलं आहे पण हात बांधून ठेवले आहेत. जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत या घटकांना न्याय मिळणार नाही. इम्पिरिकल डेटा दिल्याशिवाय काही होणार नाही. पण केंद्र सरकार हा डेटा का देत नाही कळत नाही. कदाचित केंद्र सरकारला त्यांचं पितळ उघडं पडेल अशी भीती वाटते, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.