जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ऍड रवींद्र पाटील यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले ऍड पाटील यांच्या या राजीनाम्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती.
जिल्हा बँकेने मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई संस्थांनला दिलेल्या कर्जाच्या सेटलमेंटच्या विषयाबाबत बँकेकडून कार्यवाही होत नसल्याने ऍड पाटील हे नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. जिल्हा बँकेला मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या विषयाबाबत नोटीस बजावलेली असतानाच दुसरीकडे संचालक ऍड रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेचे अध्यक्षा ऍड रोहिणी खडसे आणि ऍड रवींद्र पाटील हे दोघे नेते जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत व्यासपीठावर एकत्र आले असता दोघांना माध्यमांनी प्रश्न विचारले. प्रारंभिक दोघे बोलण्यास तयार नव्हते, परंतु पत्रकारांनी आग्रह धरल्याने दोघे बोलते झाले. याप्रसंगी संचालक पदाचा राजीनामा दिलेले ॲड पाटील म्हणाले मी दिलेल्या राजीनाम्यामागे कोणतेही राजकारण नाही. काही अडीअडचणी असतील तर त्याबाबत नाथाभाऊ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मुक्ताई संस्थांच्या कर्जफेड बाबतीत वन टाइम सेटलमेंट विषय हा सन २०२० पासून आहे. या बाबतीत कायदेशीर बाबींचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
तर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, रवींद्र पाटील हे बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना बँक कारभाराचा अनुभव आहे. तसेच रवींद्र पाटील यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा विषयासंदर्भात माहिती देताना रवींद्र पाटील यांनी सांगितले की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. तर जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राजीनामा नामंजूर केला असल्याचे सांगितले.