पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यपाल नियुक्ती सदस्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोचरी टीका केली होती. राज्यपालांनी मात्र या टीकेवर बोलणं टाळलं. पवार मोठे नेते आहेत, त्यांच्यावर टीका करायलाच हवी का?; असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सिंहगड किल्ल्यावर आले होते. त्यावेळी मीडियांनी त्यांना पवारांच्या टीकेवरून प्रश्न विचारले. यावेळी कोश्यारी यांनी या प्रश्नावर हसून मोजक्याच शब्दात उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोठे व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल आपण काय टीका करणार? ते आपल्या देशाचे माननीय व्यक्ती आहेत. ते काही बोलले तर आपण त्यांच्यावर टीका करायला हवी का?, असा प्रतिसवाल राज्यपालांनी केला.
शरद पवार यांनी काल मुंबईत मीडियाशी संवाद साधताना राज्यपालांवर बोचरा वार केला होता. मी राज्यपालांचं विधान ऐकलं. ते म्हणाले सरकार मागणी करत नाही तुम्ही का विचारताय. मात्र, पत्र गेलेलं आहे. वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल. त्यांनी आधी पत्र दिलं, त्यानंतर शिष्टमंडळही भेटून आलं. आपल्याकडे म्हण आहे शहाण्यांना शब्दाचा मार, अशा शब्दात पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोला हाणला होता.