जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव शहरासह परिसरात अनेक दिवसांपासून डासांचा उपद्रव सुरू झाला आहे. ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचल्यामुळे तसेच काही ठिकाणी गवत, काटेरी झुडपे यांच्यात वाढ झाल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, शहरात डासांच्या चाव्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे बारा डेंग्यू सदृश्य रूग्ण रुग्णालयात दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
राज्यात कोरोना आटोक्यात आल्यामुळे काही निर्बंधांमध्ये सवलत मिळाली आहे. रात्री दहा वाजेपर्यंत सर्व व्यापारी संकुल व मॉल्स उघडे ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. असे असताना जळगावात मात्र डेंगू सदृश्य रुग्णांची वाढ होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जनऔषध वैद्यकशास्त्राच्या एका सहाय्यक प्राध्यापकाला डेंग्यूची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. शहरातील काही खाजगी दवाखान्यात देखील विविध आजारांचे रुग्ण दाखल होत असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्दी-पडसे आणि डासांमुळे हैराण झालेले संशयित रुग्णांचा त्यात समावेश आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागातील मलेरिया कर्मचाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी डासांची उत्पत्ती वाढू नये म्हणून फवारणी व धुरळणी करावी अशी मागणी होत आहे. तसेच ज्या कॉलनी व परिसरात उघड्या प्लॉटवर गवत व झाडेझुडपे वाढली असतील त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.