मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा | ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात यावे आणि याला दोषी असणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेनेकडून धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. गेल्या दीड महिन्यांपूर्वी वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेअंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांचे केळी व इतर पिके संकटात आल्याने शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार गेल्या महिनाभरापुर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक झाली. यात ओझरखेडा धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी चर्चा होत पालकमंत्र्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती व पंप दुरुस्तीसाठी तात्काळ कार्यकारी संचालक यांचेशी चर्चा करून निधी उपलब्ध करून दिला होता.
या प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ११ ऑगस्टला मुंबई येथे व जिल्हाधिकारी डॉ. राऊत यांना १० ऑगस्टला ओझरखेडा धरणात तातडीने पाणी सोडणे व संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई वसूल करावी; अशा मागणीचे निवेदन दिले होते. परंतु आद्यपपावेतो कुठलीही कारवाई न झाल्याने पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व हजारो शेतकरी थेट ओझरखेडा धरण येथे आज जलसमाधी आंदोलन करण्यात आले.