राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यातील दारुची दुकानं उघडी ठेवता. मात्र, मंदिरं बंद ठेवता हे चूक आहे. जेवढी गर्दी बार किंवा मॉलमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरं सुरु करण्यास काय हरकत आहे? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. ते आज पंढरपुरात बोलत होते. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर राज्य सरकारनं निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार दुकानं, मॉल, हॉटेल आदींसाठी रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील मंदिरं आणि धार्मिक स्थळं पुढील आदेशापर्यंत बंदच असतील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता आक्रमक झाल्याचे दिसून आले.
आमच्यासाठी सगळीकडे देव आहे. मात्र, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. हारवाल्यापासून ते पुजारी अशा अनेकांची उपजीविका ही मंदिरांवर अवलंबून असते. त्यांच्यासाठी तरी मंदिरं उघडा. मंदिरं बंद ठेवणे ही सरकारची चूक आहे. तुम्ही दारुची दुकानं सुरु ठेवता आणि मंदिरं बंद ठेवता, अशा शब्दात फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि सुधारकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले होते. गणपतराव देशमुख यांचं विधिमंडळात उचित स्मारक करण्याची मागणी करणार असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले. शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत सरकार धरसोड करत आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असंही फडणवीस यांनी म्हटळे आहे.
राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपची अध्यात्मिक आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औरंगाबादेतील घृष्णेश्वर मंदिरासमोर भाजपची अध्यात्मिक आघाडी आंदोलन तुषार भोसले यांच्या उपस्थितीत करणार आहे. सध्या श्रावण महिना सुरु असल्यामुळे भाविकांसाठी श्रावणातील सोमवार हा महत्वाचा दिवस असतो. त्यामुळे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी हे आंदोलन केलं जाणार असल्याची घोषणा तुषार भोसले यांनी केली आहे.