राजमुद्रा वृत्तसेवा | पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजीच्या किंमतीत वाढ केली असून पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये भूकंप येणार आहे. विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा २५ रुपयांची वाढ करण्यात आली असून सोमवारी रात्रीपासूनच ही वाढ लागू झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये घरगुती वापरासाठी १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ८५९.५ रुपयांवर गेली आहे. १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची कोलकातामध्ये ८८६ रुपये, मुंबईत ८५९.५ रुपये आणि लखनऊमध्ये ८९७.५ रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही ६८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत त्यांची किंमत वाढून १६१८ रुपये झाली आहे.
२०२१ च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला पुन्हा किंमत वाढून ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत कमी होऊन ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८१९ रुपये करण्यात आली. एप्रिलच्या सुरुवातीला १० रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत ८०९ रुपयांवर गेली होती. एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १६५.५० रुपयांची वाढ झाली आहे. तर डिसेंबरपासून आतापर्यंत सिलिंडरच्या किमतीत सुमारे २७५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.