भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | २०२०-२१ या काळात लॉकडाउन असतानाही रेल्वे प्रशासनाने मात्र भंगार विक्रीतून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. एकीकडे कोरोनामुळे रोजगार बंद असताना दुसरीकडे रेल्वे प्रशासनाला भंगार विकून तब्बल ३९१ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाला आहे.
याबाबत माहिती देताना रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, लॉकडाउन दरम्यान मध्य रेल्वेने विविध रेल्वे परिसरातील स्क्रॅप विकून ३९१ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या अनेक विभागांचे योगदान राहिले असून रेल्वे परिसरही मोठ्या प्रमाणावर स्वच्छ झाला आहे.
मध्य रेल्वेने झिरो स्क्राप मिशन सुरू केले असून या अंतर्गत रेल्वे स्क्रॅप, खराब झालेले डबे, वॅगन, लोकोमोटिव्ह आदींची विक्री करण्यात आली. ८.६५ कोटी रुपयांच्या उत्पन्नासह मध्य रेल्वेने लिलावाद्वारे या साहित्याची विल्हेवाट लावली. गेल्या पंधरा वर्षांतील ही सर्वाधिक रक्कम असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या काळात प्रवासी बंद असल्यामुळे रेल्वेला झालेले नुकसान या माध्यमातून बऱ्याच अंशी भरून निघाले आहे. आता २०२१-२२ मध्ये या अंतर्गत चारशे कोटीचे लक्ष ठेवण्यात आले आहे.