जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | औरंगाबाद येथे उद्योजकांना मारहाण करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. प्रशासनाकडून गुंडाविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे निषेध करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन देखील देण्यात येणार आहे.
औरंगाबाद येथे उद्योजक, व्यापाऱ्यांना कोणत्याही कारणाशिवाय धमकावणे आणि मारहाण करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. यासंदर्भात वारंवार स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करून देखील गुंडांवर ठोस कारवाई केली जात नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रकारात गुंडांनी व्यापाऱ्याला सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत असे विचारून त्यासमोर मारहाण केली. गुंडांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच असून व्यापारी वर्गाची मनस्थिती खालावत आहे. कोरोनामुळे आधीच बेजार झालेल्या व्यापाऱ्यांना गुंडांच्या दहशतीचा मोठा धक्का बसला आहे.
संपूर्ण राज्यात या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून सर्व व्यापारी व उद्योजकांकडून शासनाचा सामूहिकपणे निषेध करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया यांच्यासह सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी घटनेचा सामुहिक विरोध केला आहे. हल्ल्याचे प्रकार असेच सुरू राहीले तर व्यापाऱ्यांकडून संघटितपणे उभे राहून येणाऱ्या दिवसात अशा घटनांचा सामुहिकपणे विरोध करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.