मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत. आपल्याला आपलं राज्य वाचवाचयं, पुन्हा भाजपचं सरकार आणायचंय, राज्य उद्धवस्त करणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचायचंय”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आजपासून नारायण राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली. मुंबईतल्या पहिल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला.
भाजपच्या मंत्र्यांची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मुंबईमध्ये आहेत. सकाळी ११ वाजता त्यांचं मुंबई विमानताळवर आगमन झालं. त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं.
“महाराष्ट्र उध्वस्त करायला निघालेल्यांना सांगू इच्छितो, तुमचा काळ संपला आहे. राज्यात पुन्हा भाजपाचे सरकार येणार आहे:, असा दावा करत यावेळी राणेंनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बळ आणलं. आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी जोमाने काम करावं लागेल, कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
“महाराष्ट्रातील सरकाराने गेल्या अडीज वर्षात कोणताही विकास केलेला नाही. उद्धव ठाकरे हे राज्याला उद्वस्त करत आहेत. आता हे सरकार हटविण्याची वेळ आली आहे. या सरकारचा काळ आता संपला आहे, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार येणार”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“मी काम करु शकतो हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला. मला मिळालेलं पद हे जनतेचं पद आहे. केंद्रात मंत्री झाल्यानंतर वेगळा अनुभव घेता आला. महाराष्ट्राचं नाव देशात केल्याशिवाय राहणार नाही”, असंही राणे म्हणाले.
नारायण राणेंचं मुंबईत आगामन झाल्यानंतर विमानतळावरुन ते थेट शिवाजी पार्कात जाणार आहे. तिथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते वंदन करतील. तिथेच शेजारी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राणे जाणार का?, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांना आम्ही स्मृती स्थळावर जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतलीय. तर स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांचा आशीर्वाद घेणार असल्याचा निर्धार राणेंनी केला आहे.
मुंबईच्या अनेक भागांतून राणेंची जनआशीर्वाद यात्रा जाणार आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राणे जनतेशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान महाविकास आघाडी सरकारवर काय हल्लाबोल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अंगावर घेण्यासाठीच नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे, अशी राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा राहिली आहे. आता खुद्द राणे शिवसेनेच्या अंगणात येत आहेत. आज राणे शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर कोणत्या शब्दात हल्लाबोल करणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.