कट्ट्यावरची चर्चा…
(राजेंद्र शर्मा)
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विविध राजकीय बैठकांना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांच्यासोबत मुंबईत माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल तयार करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बहुतांशी नेत्यांचा प्रयत्न आहे. राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी याबाबत मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. तर अनेक नेत्यांनी मुंबईत अनेकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व अबाधित राहावे यासाठी नेत्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक सर्वपक्षीय आणि बिनविरोध व्हावी यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असले तरी, हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येतील काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेने निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्या दृष्टीने यंत्रणा कामकाजाला लागली आहे. या संदर्भात विविध राजकीय पक्षांची एकत्रित बैठक घेण्यात यावी यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईत बँकेसाठी पदाधिकारी आजी माजी संचालकांकडून भेटीगाठी सुरू आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षाच्या नेत्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी मुंबईत माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे समजते. या भेटीनंतर भाजपचे आ. गिरीश महाजन यांची भेट घेण्यात आली. दोन्ही माजी मंत्र्यांकडे विद्यमान पालकमंत्र्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक आ. चिमणराव पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यापूर्वी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या सोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर डॉ. सतीश पाटील, बँकेचे उपाध्यक्ष आ. किशोर पाटील, ज्येष्ठ संचालक संजय पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. या चौघांमध्ये बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. राखीव सहा जागांसाठीचे संभाव्य उमेदवार सर्वपक्षीय पॅनल, महाविकास आघाडीचे पॅनल यावर चर्चा रंगली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही मतदारसंघात नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तसेच राखीव जागांमध्ये जागा वाटप न झाल्यास निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत भाजपचे आमदार गिरीश महाजन हे आपल्या पक्षातील आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात अद्याप काँग्रेस आयची भूमिका समजू शकलेली नाही. अद्याप त्यांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. निवडणुकीच्या हालचाली मात्र या गटात सुरू झाल्या आहेत. परंतु निवडणुकीबाबत काय रणनीती राहणार आहे, हे अद्याप नेत्यांनी स्पष्ट केलेले नाही. आ. शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह बहुतांशी नेत्यांकडे मात्र नजर लागून आहे.