मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांना नुकताच सक्तवसुली संचालनालय (ईडी) मुंबई येथे हजर राहण्यास संबंधी समन्स बजावण्यात आला होता. परंतु मंदाताई खडसे यांना डेंग्यू झाला असल्याचा मेल त्यांनी संबंधित विभागाला केला असल्याने त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे चौकशीचे कामकाज अपूर्ण राहिले आहे.
सध्या राज्यात पुणे येथील भोसरी जमीन खरेदी प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात अनेक दिवसांपासून ईडीचा ससेमिरा खडसे कुटुंबियांवर लागला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंदाकिनी खडसे यांना सक्तवसुली संचालनालया तर्फे नोटीस देण्यात आली होती. त्यांना १८ ऑगस्ट बुधवार रोजी हजर राहण्याबाबत समन्स पाठवण्यात आले होते. दरम्यान, आपणास डेंग्यू झाला असून आपण उपस्थित राहू शकत नाहीत, असा मेल मंदाकिनी खडसे यांनी ईडीला पाठविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तथाकथीत भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी यापूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरिष चौधरी ईडीच्या ताब्यात असून यात जमीन खरेदी मध्ये दुसरे खरेदीदार मंदाकिनी खडसे असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी मंदाकिनी खडसे यांना समन्स बजावले असता त्यांनी हजर राहण्यास वेळ मागितली होती. ती वेळ पूर्ण झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयात हजर राहण्यास असमर्थ होत्या. तसेच एकनाथराव खडसे हे मागील महिन्यात २३ तारखेला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यामुळे देखील मंदाताई खडसे या कार्यालयात हजर राहू शकल्या नाहीत. त्यांना १८ ऑगस्ट बुधवार रोजी जमिनीचे सर्व कागदपत्र घेऊन चौकशीसाठी हजर राहण्याचे कळविले होते असेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान याच प्रकरणात जळगाव जिल्हा सहकारी बँकेला देखील नोटीस देण्यात आली आहे. संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्ज प्रकरणी कागदपत्रे सादर करण्याची नोटीस देण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नियमांचे उल्लंघन करून कर्ज देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची चौकशी सुरू असल्याचे बोलले जात आहे.