मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | “मला कोणासमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं, नमस्कार करावासा वाटतो हा माझा प्रश्न आहे. आता त्यात गोमूत्र कोणाला शिंपडायचं शिंपडू द्या, कोणाला प्यायचं त्याला पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध? मला काय विचारता, त्यांना विचारा ना की का शिंपडलं? काय दूषित झालं होतं?” असे वक्तव्य करून आज नारायण राणेंनी शिवसैनिकांवर टीका केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या अवस्थेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “एवढाच जर स्मारकाबद्दल आदर आहे, तर ते ज्या स्थितीत आहे, त्याकडे लक्ष द्या. पँट वर करून दलदलीतून तिकडे जावं लागतं. मी अनेक स्मारकं पाहिली आहेत, त्याच्या आजूबाजूला सुंदर लॉन असतं, सुशोभीकरण केलेलं असतं. झाडं आहेत. इथे काय आहे? साहेबांचा फोटोही नीट दिसत नाही. जे गोमूत्र शिंपडायला आले ना, त्यांनी ते स्मारक जागतिक किर्तीचं कसं होईल याकडेही पाहावं, हेच माझं त्यांना उत्तर आहे. स्मारकाचं शुद्धिकरण करण्यापेक्षा आधी मन शुद्ध करा”.
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. त्यानंतर नारायण राणे यांनी याविषयी आपल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांना खडे बोलही सुनावले.
आज झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना राणे म्हणाले, “मी पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळं स्थान आहे. मी पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही. पत्रकारांचं मार्गदर्शन आम्हालाही मिळावं, तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र सध्या पत्रकार मला देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारणा करत आहेत. ह्या एकाच विषयासाठी आम्ही आलो आहोत का?” असेही राणे म्हणाले.