राजमुद्रा वृत्तसेवा | भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर आज दगडेफकी सोबत शाईफेकीचा देखील प्रयत्न झाला असल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान शिवसैनिकांनी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. यावर शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले, आक्रमक शिवसैनिकांनी म्हणूनच दगडफेक झाली असावी,’ असं भावना गवळी म्हणाल्या आहेत.
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची आज किरीट सोमय्या पाहणी करण्याकरिता आले होते. मात्र भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक आणि शाई फेक केली. याविषयी खासदार भावना गवळी यांना विचारले असता, पार्टीकल बोर्ड कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. शिवाय पोलिसांनी कारखान्यावर जाऊ नका, असे सांगूनही ते गेले, त्यामुळं शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले. त्याचमुळे दगड फेक झाली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या.
यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.
आज सोमय्या वाशिम दौऱ्यावर आले असता भडकलेल्या भावना गवळींच्या समर्थकांनी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक केली. यावेळी सोमय्य्या यांच्यासोबत भाजप आमदार राजेंद्र पाटणी होते.
शिवसेनेच्या धमक्यांना मी घाबरत नाही. अशा रोजच मला धमक्या येतात. मी आज वाशिम येथे आलो असता माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.