भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या हद्दपारीच्या प्रस्तावासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका परत घेनाय्त आली असून कोर्टाने चौधरी यांनी केलेल्या विनंतीला मान्यता देत त्यांच्या हद्दपारी संदर्भात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
भुसावळ शहरात सध्या हद्दपारीचे सत्र सुरू असून खरात गटानंतर सूर्यवंशी टोळीला हद्दपार करण्यात आले आहे. शहरातील सुमारे शंभर जणांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यातील ५५ जण पोलिसांच्या नजरेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, प्रशासनाने माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांना हद्दपारीची नोटीस पाठवली होती. या अंतर्गत अनिल चौधरी यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेच्या खुलासा संदर्भात प्रशासनाने न्यायालयात अहवाल दाखल केला होता. त्यानंतर अनिल चौधरी यांनी ही याचिका परत घेतली असून, प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती न्यायालयाला केली आहे. कोर्टाला देखील यावर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने सादर केलेल्या हद्दपारीच्या कारवाईवरील सुनावणी तातडीने पूर्ण करावी व यावर निर्णय घ्यावा याची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.
परिणामी, अनिल चौधरी यांच्या हद्दपारीच्या कारवाईचे कामकाज प्रशासनाला लवकरात लवकर मार्गी लावून त्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. दरम्यान प्रशासनाला पोलीस खाते व अनिल चौधरी या दोहोंच्या बाजूंची सुनावणी घेत निर्णय घ्यावा लागणार असून, उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे ही प्रक्रिया स्थानिक प्रशासनाला लवकरात लवकर करावी लागणार आहे. त्यामुळे यावर काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.