नागपूर राजमुद्रा वृत्तसेवा : – कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत आहे. येत्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण आवश्यक असून कोरोनावर मात करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सद्भावना जीवनरथ लसीकरण दोनशे वाहनांच्या हस्तांतरण समारंभाप्रसंगी केले.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना जीवनरथ दोनशे लसीकरण वाहनांचे हस्तांतरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दृकश्राव्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
महापारेषण कंपनीतर्फे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी 25 कोटी रुपयांचा सीएसआर निधी विदर्भ सहायता सोसायटीला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून विदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या लसीकरण वाहनांचे हस्तांतरण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर तसेच दृकश्राव्य पद्धतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, इतर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आमदार राजू पारवे, महापालिकेचे विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला आदी उपस्थित होते.
कोरोनासोबतच अतिवृष्टी व पुरासारख्या संकटाचा सामना करताना जनतेच्या संरक्षणाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात 5 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. एका दिवशी 9 लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले असून केंद्र शासनातर्फे जेवढे जास्त डोस उपलब्ध होतील त्यानुसार सर्वांना लस देण्यात येईल. लसीकरण केंद्रांपर्यंत पोहचू शकत नाहीत, अशा नागरिकांचे घरी जावून लसीकरण करण्यासाठी दोनशे लसीकरण वाहने उपयुक्त ठरणार आहेत. लसीकरणासाठी संपूर्ण मदत देण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लसीकरण वाहनांचे हस्तांतरण व मोहिमेचा शुभारंभ करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सद्भावना जीवनरथाच्या माध्यमातून विदर्भातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी लसीकरण वाहने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संत गाडगे महाराजांचा संदेश अंमलात आणून मेळघाट, गडचिरोली यासारख्या अतिदुर्गम भागात पोहोचून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे. ऊर्जा विभागाच्या दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध करुन देण्याचा देशातील व राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून राजीव गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच सद्भावना दिनी आयोजित होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेच्यासंदर्भात लसीकरण महत्त्वाचे असून जनतेला या महामारीपासून दूर ठेवण्यासाठी दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध केल्याबद्दल विदर्भ सहायता सोसायटी व महापारेषणचे विशेष अभिनंदन केले. आगामी काळातील सण व उत्सव साजरे करताना कोविडचा प्रोटोकॉल तंतोतंत पाळला जाईल याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन केले.