मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेवर असून पहिल्यांदाच मी मुंबईपासून दीड महिना दूर राहिलो. नाही तर पंधरा दिवसाच्यावर मुंबईपासून कधी दूर राहिलो नाही, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस मला कंटाळले होते की काय म्हणून मला दिल्लीत पाठवलं, असा मिश्किल टोला नारायण राणे यांनी लगावला. राणेंच्या या मिश्किल टोलेबाजीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नारायण राणे यांची काल मुंबई विमानतळापासून जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली. यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत त्यांनी ही मिश्किल टोलेबाजी केली. दीड महिन्यानंतर तुम्हा सगळ्यांना पाहतो. आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईपासून दीड महिना दूर राहिलो. नाही तर पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ बाहेर राहिलो नव्हतो. देवेंद्र फडणवीस कंटाळले होते का मला की त्यांनी मला दिल्लीला पाठवलं. त्यांनी सद्भावनेने मला दिल्लीत पाठवलं. प्रेमापोटी त्यांनी पाठवलं. मी काम करू शकेल या विश्वासापोटी त्यांनी मला दिल्लीत पाठवलं, असं राणे म्हणाले.
फडणवीस यांनी मला ज्या उद्देशाने मोदींच्या मंत्रिमंडळात पाठवलं. त्या मोदींना ताकद देणं, पाठबळ देणं हे माझं काम राहील. मोदींना सहकार्य करूनच काम करणार आहे, असं सांगतानाच मंत्रिमंडळात सहभागी झाल्यावर एक वेगळा अनुभव घेता आला. मोदींच्या नेतृत्वात कॅबिनेटमध्ये बसताना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो असं वाटलं नाही. कॅबिनेटच्या बैठकीला थोडा वेळ बसलो तेव्हा कुठे देवेंद्र दिसेल. कुठे प्रवीण दरेकर दिसेल, कुठे आशिष दिसेल असं वाटत होतं. पण यातलं कोणी दिसलं नाही. त्यामुळे आपण दिल्लीत आल्याची जाणीव झाली, असं भावूक उद्गारही त्यांनी काढलं.
नारायण राणे यांनी मिश्किलपणे केलेल्या या वक्तव्यावरही राजकीय कयास लावले जात आहेत. राणे यांना मंत्रिपद दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणारव फारसा प्रभाव पडणार नाही. राज्यात सत्तांतर होईल अशी परिस्थितीही नाही. फक्त शिवसेनेवर वचक ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. महापालिका निवडणुकीत शिवसेनेवर टीका करण्यासाठी भाजपला फायरब्रँड नेत्याची आवश्यकता होती. राणेंच्या रुपाने ती भरून निघेल. त्यामुळे महापालिका निवडणुकीचं रण तापेल. परंतु, राणेंमुळे भाजपची व्होट बँक वाढेल असं वाटत नाही, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक ज्ञानेश्वर खंदारे यांनी सांगितलं. राणेंनी फडणवीसांबाबत केलेलं विधान हे मुद्दाम केलेलं नाही. मिश्किल विधान करण्याच्या ओघात ते बोलून गेले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.