जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण झाली त्यांचे मारेकरी सापडले मात्र सूत्रधार अद्याप मोकाट आहे. त्यामुळे हत्येमागील सूत्रधार पकडावा तसेच तपासातील दिरंगाई थांबवावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जळगावतर्फे उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना निवेदन देण्यात आले.
शहीद पद्मश्री डॉ नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने काही मारेकऱ्यांना पकडलं देखील. मात्र या हत्येमागील मुख्य सूत्रधार कोण आहे हे मात्र तपास यंत्रणा अजून पर्यंत शोधू शकली नाही. तसेच हे सूत्रधार अद्यापही मोकाट आहे. या हत्येमागे नेमके कोणाचे डोके आहे हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. त्यामुळे तपास यंत्रणेने लवकरात लवकर या खुनामागील सूत्रधारांना पकडून त्यांना शासन होण्यासाठी प्रयत्न करावे अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी एस कट्यारे यांनी या वेळी दिली.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस कट्यारे, कायदा विभागाचे जिल्हा पदाधिकारी अँडव्होकेट भरत गुजर, जिल्हा समन्वयक विश्वजीत चौधरी, जिल्हा सदस्य राजेंद्र चौधरी, शाखा सदस्य सुरेश थोरात, देविदास सोनवणे आदी उपस्थित होते.