मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्य सरकारतर्फे राज्यातील लॉकडाऊन उठवण्यात संदर्भात निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणावर शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले होते. दरम्यान, येणाऱ्या काळात गणेशोत्सव व इतर महत्त्वाचे सण येणार असल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचे संकेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन साठा होत नसल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल असे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
मुंबईतील सांताक्रुझ येथे बाल कोविड काळजी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, देशात इतर राज्यांमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचा आकडा वाढत असल्याचे दिसले आहे. आपल्याकडे याचा धोका वाढणार नाही याची काळजी आपण घेत आहोत. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. आपण जर नियम पाळले नाहीत तर, कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल. सध्या गर्दीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात जेव्हाही कोविड रुग्णांमध्ये सातशे मॅट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन लागेल तेव्हा कदाचित आपल्या राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असे ते म्हणाले.