नंदुरबार राजमुद्रा वृत्तसेवा | शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील अनरद गावातून चोरट्यांनी चोरीच्या सामानासह चक्क देव्हाऱ्यातील देव पळवून नेल्याची अजब घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या या परिसरात चाकूचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी वावरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अजब चोरीमुळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सारंगखेडा येथील अनरद या छोट्याशा गावात एकाच रात्री आठ ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. सारंगखेडा येथील कळंबू रस्त्यालगत असलेल्या भागात राहणाऱ्या घरात भर दिवसा झोपलेल्या महिलेच्या गळ्याला चाकु लावुन घरातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम पळवून नेली. त्यानंतर मध्यरात्री शहादा तालुक्यातील अनरद गावातील गावात आठ ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. त्यातील एका घरात चक्क सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह देव्हाऱ्यातील देवही पळविल्याची घटना घडली आहे. कल्पना माळी असे या घर मालकाचे नाव असून, चोरी झाली त्या वेळी श्रीमती माळी या गावी गेल्या होत्या सकाळी परत आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
कोरोनानंतरच्या काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून गेल्या आठवड्यात सारंगखेडा, टेंभा, कळंबू, अनरद, बामखेडा परिसरात चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. चाकूच्या धाकावर या चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांपुढे ही आव्हान उभे राहिले आहे.