‘द मॅसेज ऑफ रमजान‘ वेबिनार संपन्न
जलगांव मायनोरिटी जर्नलिस्ट ग्रुप तर्फे आयोजन
जळगांव, दि. 25 (प्रतिनिधी) – “रोजा म्हणजे केवळ अन्न-पाण्यापासून दूर राहून भुकेची यातना सहन करणे एवढेच नव्हे तर आखून देण्यात आलेली मर्यादेचे यांचे तंतोतंत पालन करणे, अल्लाहची इबादत (भक्ति) करणे व वाईट प्रवृत्तींपासून दूर राहणे होय. रोजा भुकेल्याची भूख आणि तहानलेल्याच्या तहानाची जाणीव करून देतो. रोजा म्हणजे अल्लाहची साधना करणे होय. ईश्वराचे भय निर्माण होईल, भय म्हणजे तुमच्यावर अल्लाहची दृष्टी कायम आहे हे जाणून घेऊन आपणाकडून कुठलाही गुनाह (पाप) होणार नाही याची खबरदारी घेणे होय.”या महिन्यातील बंद्याची इबादत अल्लाहला अधिक पसंत असते. रमजान महिन्याचे पूर्ण तीस दिवस रोजा धरून चांगले कर्म करीत राहण्याची वृत्ती आत्मसात करून पुढील अकरा महिन्यांसाठी आपल्याकडून कुठलेही (गुनाह) पाप होणार नाही याचे प्रशिक्षणच असते,” असे प्रतिपादन स्टुडेंट ऑफ इस्लामिक ऑर्गनायझेशनचे माजी अध्यक्ष सुहेल आमीर यांनी केले. जलगांव जर्नलिस्ट मायनोरिटी ग्रुप तर्फे आय़ोजित ‘द मॅसेज ऑफ रमजान’ विषयावर आयोजित ऑनलाईन खुले वेबिनार संपन्न झाले त्यावेऴी ते बोलत होते.
इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद सल्ललाहो अलैही वसल्लम यांचा अतिशय प्रिय महिना म्हणूनही माहे रमजानला संबोधलं जातं. ‘माहे रमजान’ चा हा पवित्र व प्रामणिक असा महिना मनुष्याला स्वत:ची इंद्रिये ताब्यात ठेवण्याची तालीम देतो. कलमा, नमाज, रोजा जकात आणि हज ही इस्लामची पाच स्तंभ आहेत. पैकी रमजान महिन्यात मुस्लिमांना आपल्या एकूण मिळकतीच्या अडीच टक्के रक्कम ज्याला ‘जकात’ म्हटले जाते, ती रक्कम गोरगरिबास दान करणेही अनिवार्य असते जेणेकरून गरीबांचे पोट भरण्यास मदत होईल, असे ही सुहेल आमीर यावेळी म्हणाले. 2016 मध्ये नोबल पुरस्कार प्राप्त जापानचे वैज्ञानिक योशिअरा ओशोमी यांनी केलेल्या संशोधनात ही रोजाचे महत्त्व विषद केले आहे. कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारापासून बचाव म्हणजे ‘रोजा’ असे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा मनुष्य उपाशी असतो तेव्हा शरीरातले न्यूट्रिएन्स संपतात. तेव्हा आंतरीक शरीर हे आतील खराब झालेल्या भागाला गिळू लागतो याला ‘ऑटोफेगि’ म्हटले जाते. त्यामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण खूप कमी होते. महिनाभर जर 8-9 तास उपाशी राहिले तर आपण कॅन्सरसारख्या रोगापासून दूर राहू शकतो.
‘आपल्या हातून आणि जिभेने कुणालाही त्रास होणार नाही असे वागण्याची शिकवण इस्लाम देतो. रोजाद्वारे हे सगळं करणे सुलभ होते. तसेच आपल्या शरीरात अधिक प्रमाणात ग्लुकोज जमा असते त्याचा वापर या रोजा धरताना होतो. रोजा धरल्यामुळे ब्लड शुगर आणि इन्सुलिनचे योग्य प्रमाण साध्य होते,’ असे विचार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईचे मोहम्मद उरूज व्यक्त केले. पुढे ते म्हणाले-“रोजाचा मूळ उद्देश सर्वांकरिता एकच आहे. रोजाचा अर्थ स्वत:वर संयम राखणे. रमजान तो महिना आहे, ज्यामध्ये कुराणाचे अवतरण झाले जो संपूर्ण मानवजातीकरिता जीवन मार्गदर्शकच आहे . सर्वांसाठी आयोजित ‘द मॅसेज ऑफ रमजान’ या वेबिनार मध्ये हिंदू-मुस्लिम तरूणांनी सहभाग नोंदवत सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रईस अमीर, साजीद शेख आणि आरिफ शेख यांनी परिश्रम केले.