मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | मातोश्रीच्या बाजूलाच लागून असेल्याला एका ठिकाणावरून यात्रेतील पाहिलं भाषण करतेवेळी त्यांनी, “मी जिथं उभा आहे, तिथून जवळच कलानगर आहे. त्यांच्याही कानावर काही गोष्टी जायला पाहिजेत. येणाऱ्या महापालिकेत गेल्या २ वर्षात तुम्ही जनतेला कसं बनवलं, याचा उद्धार होणारच आहे. पण, जनता तुमच्या कारभाराला कंटाळली असून, मुंबई महापालिकेचा कारभार तुमच्या हातात राहणार नाही,” असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केला.
“मुंबईची महापालिका भाजपला जिंकवून देण्यासाठीच मी आलो आहे, महापालिकेवर आमचीच सत्ता असणार. येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे,” असा हल्लाबोल त्यांनी, शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. त्यामुळे, आता मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
“राज्यातील जनता महाविकास आघडी सरकारला कंटाळली असून, या सरकारकडून राज्याचा कोणताही विकास होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत,” अशी जोरदार टीका त्यांनी महाविकास आघाडीवर आणि मुख्यमंत्र्यांवर केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर, निलेश राणे, तृप्ती सावंत उपस्थित होत्या.