(राजमुद्रा धुळे) धुळे, नंदूरबार व जळगांव जिल्ह्यात कोवीड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून दुसऱ्या लाटेत मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजारावर उपचारासाठी शहर व ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधारक डॉक्टर्स उपचार करीत
आहेत. या उपचारात स्टेरॉईड, रेमडेसिवीर आणि टोस्लीझुम्याब सारखे घातक इंजेक्शनचा वापर होत असल्याने म्युकॉरमायकोसिस (बुरशीजन्य) आजाराचे रुग्ण वाढून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर अंधत्व येणे, हृदयविकाराचा झटका येणे, मुत्रपिंड निकामी होणे, अर्धांगवायूचा झटका येणे याचे प्रमाण वाढल्याने इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या धुळे जिल्हा शाखेने तत्काळ तज्ञ डॉक्टरांची अभ्यास परिषद घेऊन घातक औषधांच्या अतिरिक्त वापर थांबविण्याबाबत मार्गदर्शन करावे अशी जाहिर मागणी सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी केली आहे.
कोवीड-१९ या आजारामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्यूचे भय वाढले आहे. शहरासकट सर्व ग्रामीण भागात सर्वसाधारण वैद्यकीय सेवा देणारे (डॉक्टर्स) सर्रास स्टेरॉईड, रेमडेसिवीर आणि टोसिलीझुमॅब अशा घातक इंजेक्शनचा वापर करत आहेत. भितीपोटी रुग्णांचे नातेवाईक असे इंजेक्शन मिळेल तिथून मिळेल त्या चढ्या दराने उपलब्ध करुन देत आहेत. गेल्यावर्षीच्या कोरोनाच्या लाटेत स्टेरॉईड, रेमडेसिवीर आणि टोसिलीझुमॅब या इंजेक्शनचा वापर अत्यल्प असतांना देखिल रुग्ण मोठ्याप्रमाणात बरे होत होते. तसेच म्युझीक थेरेपी, आयुर्वेेदीक काढे, योगासने, व्यायाम यांचाही वापर केला जात होता.
साधरणत: मार्च २०२१ पासून आलेल्या दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या जनरल सायकॉलॉजीतून स्टेरॉईड, रेमडेसिवीर आणि टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा सर्रास वापर होत असतांना दिसून येत आहे. औषधींबाबत अनभिज्ञ असणारे नाडी-पुडीचे डॉक्टर्स सुद्धा अशा घातक इंजेक्शनांचा वापर करीत आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेत कोवीड आजारात मृत्यूदर तीप्पट झाला आहे. इंजेक्शनचा अतिवापराचा दूरगामी विचार न करता सरळ -सरळ रुग्णांवर प्रभावी मारा केला जात आहे. शिवाय नव्याने वापरण्यात येणारी प्लाझ्मा थेरेपीला देखिल हा व्हायरस दाद देत नसल्याचे निर्दशनात येत आहे.सदर कोरोनाची लाट अजून वर्षभरतरी नियंत्रणात येईल असे दिसत नाही. त्यामुळे इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या धुळे जिल्ह्याच्या तज्ञ डॉक्टरांनी राज्यातील औषधी विभागाच्या तज्ञ व अनुभवी डॉक्टरांना आमंत्रीत करुन तत्काळ याबाबत विचारविनीमय करुन मार्गदर्शन करावे व पर्यायी जीवितहानी न करणरी औषधांची नावेही सुचवावीत आणि याबाबत शासनाच्या माध्यमातून उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी रक्तदान चळवळीचे कार्यकर्ते प्रा.शरद पाटील यांनी केले आहे.