जळगाव, राजमुद्रा वृतसेवा | महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास असून, ही संतांची भूमी आहे. या इतिहासाला काळीमा फासणारी घटना म्हणजेच केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे यांनी तमाम महाराष्ट्राची अस्मिता असलेले मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल काढलेले अनउद्गार, व वापरलेली धमकीची भाषा याचा मी समस्त शिवसैनिकांच्या वतीने जाहीर निषेध करते. गेल्या पंधरा दिवसांत वारंवार अशाच भाषेचा वापर त्यांनी केला असल्याने पोलीस प्रशासनाला विनंती, की अशा विकृतीच्या श्री.नारायण राणे यांच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. जेणेकरून समाजासमोर कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, हे निश्चित होईल. विविध माध्यमे, केंद्र सरकार, पंतप्रधान कार्यालय व सर्वोच्च न्यायालय यांनीसुद्धा ‘कोविड’ काळातील संपूर्ण देशातील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत केलेल्या सर्व्हेक्षणातही आपले मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवसाहेब यांच्याद्वारे केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे. या कार्यामुळेच देशातील पहिल्या क्रमांकावर स्थान प्राप्त करणार्या अशा मुख्यमंत्र्यांबद्दल असे उद्गार काढणार्या राणेंचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे श्री.नारायण राणे कधी जळगावला आले, तर शिवसैनिक त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाहीत. प्रत्येक वेळेस त्यांचा काळे झेंडे दाखवूनच निषेध होईल, हे लक्षात घ्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आज दि.24 ऑगस्ट 2021 रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यासमोर निषेधावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसैनिक श्री.गजानन मालपुरे, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ.शोभा चौधरी, उपशहरप्रमुख सौ.ज्योती शिवदे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, नगरसेविका सौ.पार्वताबाई भिल, नगरसेवक श्री.अनंत (बंटी) जोशी, नगरसेवक श्री.विक्रम (गणेश) सोनवणे, प्रा.डॉ.अस्मिता पाटील, सौ.सरिता माळी-कोल्हे, मंगला बारी, विराज कावडिया, मानसिंग सोनवणे, सत्नामसिंग बावरी, प्रशांत सुरळकर, अमित जगताप आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येेने उपस्थित होते. श्री.गजानन मालपुरे म्हणाले, की नारायण राणे मंत्री झाल्यापासून सतत बेताल वक्तव्य करीत असल्याने याची गंभीर दखल घेऊन त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी. भारतीय जनता पक्ष नेहमीच सुसंस्कृत व संस्कारांचा आव आणते. आता कुठे गेले आपले हे संस्कार? माननीय पंतप्रधान मोदी स्वच्छतेचा नारा देतात, त्यांच्या या भूमिकेचा विचार करता आपल्या मंत्रीमंडळातील अशा अस्वच्छ मंत्र्यांची त्यांनी हकालपट्टीच करून स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करायला हवी.
यावेळी उपस्थितांकडून श्री.नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर सर्व पदाधिकारी शहर पोलीस ठाण्यात गेले. तेथे शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे गुन्हा नोंदविण्यासंदर्भात निवेदन दिले. तसेच श्री.गजानन मालपुरे यांनी तत्काळ राणेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली. घोषणेबाजीने संपूर्ण पोलीस ठाणे परिसर दणाणला होता. याचवेळी आक्रमक शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोरच राणे कुटुंबियांच्या प्रतिमा दाखवत दोन वराहांसमवते ‘हे कुठेही तोंड घालतात’ असा मार्मिक टोला लगावत अनोखे आंदोलन ही टॉवर चौकात केले. तत्पश्चात सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना झाले.