जळगाव राजमुद्रा वृतसेवा | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. दरम्यान या निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवाव्यात या अद्याप निश्चित झाल्या नसल्या तरी बँकेचे नेतृत्व कोणत्या नेत्याने करावे यावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत तीन पक्षांमध्ये अवघड होणार आहे. जिल्हा बँकेच्या संचालकांच्या जागेसाठी चारी पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत ठाण मांडून बसल्यामुळे त्यांच्या भेटी गाठी घेण्याकडे राजकीय नेत्यांचा कल आहे. खडसेंना भेटण्यासाठी राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी मुंबईकडे प्रयाण करीत राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे वरिष्ठ नेत्यांकडे याबाबत बैठका रंगत सुरू आहे,
पॅनेलचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर भाजपची सर्व सूत्रे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे राहणार आहेत त्यादृष्टीने भाजपा नेत्यानी इच्छुक उमेदवारांच्या चाचपणी सुरू केल्या आहेत तसेच काँग्रेसने जिल्हा बँक निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे त्यांच्या मदतीला डॉक्टर उल्हास पाटील हे राहतील जिल्हा बँकेची निवडणूक या वेळी राजकीय आणि सहकार्याच्या दृष्टीने पाया मजबूत करण्यासाठी अनेक नवीन चेहऱ्यांची धडपड सुरु आहे. तालुकास्तरावर राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या असून इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी मोठ्या संख्येने असल्याने अद्याप निर्णय झालेला नाही वरिष्ठ पातळीवर नेते चर्चा करून काय निर्णय घेतात यावर सर्व गणित आणि बँकेच्या निवडणुकीची चित्र अवलंबून आहे.