जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | सध्या कमी पाऊस असल्याने सरपंचांसह शेतकर्यांनी केलेल्या मागणीची दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिल्यानंतर गिरणा नदीच्या पात्रातून पुराचे वाहून जाणारे पाणी दहीगाव आणि जामदा बंधार्यातील कालव्यांच्या माध्यमातून सोडण्यात आले आहे. यामुळे परिसरातील शेतकर्यांना दिलासा मिळणार असून यामुळे नागरिकांनी ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
याबाबत वृत्त असे की, गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने गिरणा धरणात चांगला पाणीसाठा होता. यंदा ऑगस्ट महिना संपण्यात आला असला तरी गिरणा धरणात फक्त ४५ टक्के इतका जलसाठा आहे. दरम्यान, धरणाच्या खालील भागातील बंधार्यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पात्रात पुराच्या स्वरूपात वाहून जाते. यामुळे हे पाणी जामदा आणि दहीगाव बंधार्यांना लागून असणार्या कालव्यांच्या माध्यमातून परिसरात सोडण्यात येते. यंदा कमी पाऊस झाल्याने शेतकर्यांसह नागरिक चिंताक्रांत झालेले आहेत. यामुळे विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना गिरणा बंधार्यांच्या कालव्यांमधून पाणी सोडण्यासाठी साकडे घातले होते. त्यांनी याची तातडीने दखल घेऊन गिरणा विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्र कुमार बेहरे यांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या अनुषंगाने जामदा आणि दहीगाव या बंधार्यांमधून कालव्यांमध्ये काल पाणी सोडण्यात आले आहे.
यातील जामदा बंधार्यातील पाण्यामुळे बहाळ, कोळगाव, भडगाव व आमडदेसह परिसराला लाभ होणार आहे. तर दहीगाव बंधार्यातून पाणी सोडल्यामुळे जळगाव, एरंडोल, धरणगाव आणि अमळनेर तालुक्यातील गावांना लाभ होणार आहे. यात प्रामुख्याने दापोरा, खेडी, रिंगणगाव, कढोली, वैजनाथ, टाकरखेडा, पाळधी, पथराड, फुलपाट, झुरखेडा, दोनगाव, चांदसर, पिंपळगाव, वराड, हिंगोणा आणि पिंप्रीसह अमळनेर तालुक्यातील पातोंडा, जळोद, कलालीसह इतर गावांना लाभ होणार आहे. यामुळे या परिसरातील शेतकर्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने दखल घेऊन कालव्यांमधून पाणी सोडण्याचे निर्देश दिल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
आता पिके शेवटची घटका मोजतांना दिसत आहेत. दरम्यान, पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळावे या करीता रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी साकडं घातलं जात होते. आज सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे छोट्या नाल्या-ओढ्यात पाणी वाहून विहिरी, बोरिंगच्या पाण्याची पातळी वाढेल. धरणगाव, एरंडोल, अमळनेर तालुक्यातील 70 ते 80 गावांना फायदा होईल.