(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
गेल्या दीड वर्षापासून पहिली लाट आणि दुसरी लाट या टप्प्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कोरोनासोबत इतर आजारही मानवी शरीरावर परिणाम करत असल्याचे प्रकार सध्या घडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मुख्यतः नाकावाटे फुप्फुसात जाऊन फुफ्फुस निकामी करण्यापर्यंत मजल मारत असतो. यावर सध्या देशांमध्ये विविध स्तरावर वैद्यकीय उपचार करून रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र असे असताना दुसऱ्या लाटेच्या अधिपत्याखाली आलेल्या बहुतांशी कोरोना रुग्णांना एका नव्या बुरशीजन्य आजाराचा सामना करावा लागतोय. तो आजार म्हणजे म्यूकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस हा बुरशीजन्य आजार होय. नाका तोंडावाटे तसेच शरीरावरील जखमेच्या मार्गाने शरीरात प्रवेश करणाऱ्या या बुरशीचा संक्रमण सध्या देशात मोठ्या प्रमाणावर म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढवत असून एका नव्या संकटाला कारणीभूत ठरत आहे.
नेमका काय आहे हा म्यूकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस?
म्यूकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे, जो म्यूकरमायसिटीज या काळ्या रंगाच्या हवेत असणाऱ्या बुरशी ने होतो. ही बुरशी हवेत सर्वत्र असते मात्र कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ग्रासत असून जबडा, नाक, डोळे या अवयवांवर आपला परिणाम दाखवत असते. योग्य उपचार न झाल्यास ही बुरशी मेंदूपर्यंत जाऊन आपला गंभीर परिणामही दाखवते. यात रुग्ण दगावण्याची शक्यताही असते.
म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार कोरोना सारख्या महामारीमुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या तसेच आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर हाय डायबिटीस, असलेल्या रुग्णांना लवकर आपल्या कचाट्यात घेतो. परिणामी दात हलून गळून पडणे, डोळा निकामी होणे, जबड्याला मोठ्या प्रमाणावर हानी होऊन मोठ्या शस्त्रक्रियेला तोंड देणे अशी अवस्था निर्माण होऊ शकते. म्यूकरमायकोसिसची लागण झाल्यावर ज्या भागावर या बुरशीने आपला परिणाम दाखवला आहे त्या भागातली त्वचा आणि आतला भाग काळा पडतो. ज्या अवयवावर या बुरशीने आपला गंभीर परिणाम दाखवला आहे तो अवयव काढून टाकून या आजाराचे संक्रमण पुढे जाण्यापासून वाचवता येते. त्यामुळे सध्या चर्चेत असलेले डोळे निकामी होऊन काढून टाकण्यात आले असे आपण वाचलेले अथवा पाहिलेले वृत्त हे मुळीच चुकीचे नाही.
कशी होऊ शकते या म्यूकरमायकोसिसची लागण?
कोरोनाचा उपचार करत असताना बऱ्याचदा स्टेरॉईड इंजेक्शन्स दिल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची तसेच रक्तातील साखर वाढण्याचे प्रमाण वाढते. परिणामी ही बुरशी कमजोर शरीरावर आपला हमला करून म्यूकरमायकोसिसची बाधा होते.
ज्या रुग्णांना सतत ऑक्सिजन वर ठेवण्यात आलेले असते त्या रुग्णांच्या ऑक्सिजन फ्लोमीटरच्या ओलाव्याच्या सततच्या संपर्कामुळे ही बुरशी वाढत जाते. ज्या रुग्णांना आधीपासूनच हाय डायबिटीज, हार्ट ट्रान्सप्लांट, लिव्हर, किडनी यांच्या समस्या असून रोगप्रतिकार शक्ती कमी असते अशा रुग्णांना याची बाधा लवकर होते. तोंडावाटे तसेच नाकावाटे या बुरशीचा शरीरात शिरकाव होतो. नव्या संशोधनात असेही आढळले की शरीरावर काही छोटी अथवा मोठी जखम असल्यास त्यातूनही ही बुरशी शरीरात प्रवेश करू शकते. मात्र याचा परिणाम फक्त कोरोनामधून बऱ्या झालेल्या कमी रोगप्रतिकारक रुग्णांमध्येच दिसून येते.
काय आहेत म्यूकरमायकोसिसची लक्षणे?
म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण झाल्यास सर्वप्रथम नाक आणि डोळ्या जवळ दुखणे सुरू होते. हळूहळू हा त्रास वाढत जाण्याची शक्यता असते. त्यानंतर ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, नाकातून रक्त येणे किंवा रक्ताच्या उलट्या होण्यापर्यंत लक्षणे दिसू शकतात. या आजारात बऱ्याचदा मानसिक ताणही येतो. गालाच्या हाडांमध्ये सूज निर्माण होऊन त्रास होऊ लागतो. त्यानंतर दात आणि जबडे बाधित होऊन वेदना सुरू होतात. नजर कमजोर होते. छाती दुखणे, त्वचेवर अचानकपणे जखमा तयार होणे यांसारखी लक्षणे ब्लॅक फंगस मध्ये दिसून येतात.
कशी आहे या आजारावरील उपचार पद्धती?
म्यूकरमायकोसिस हा फंगल इन्फेक्शनचा प्रकार असल्याने या आधारावर सुरुवातीला अँटीफंगल औषधांचा प्राथमिक उपचार केला जातो. हा आजार जर पहिल्या टप्प्यात असेल तर अँटीफंगल औषधांनी तो बरा होण्याची शक्यता अधिक असते मात्र आजाराचा टप्पा वाढला असेल तर एक ते दीड महिन्यांचा दीर्घ उपचार रुग्णावर केला जातो. सध्या बहुचर्चित असलेले एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन हे सुद्धा एक प्रकारे अँटीफंगल औषध म्हणून काम करते. म्यूकरमायकोसिसची लागण ही दीर्घ प्रमाणात असल्यास यावर उपचार करणे हे एकट्या डॉक्टरचे काम नाही. या गंभीर रुग्णाचा उपचार करण्यासाठी मायक्रोबायोलॉजीस्ट, न्यूरोलॉजिस्ट, मेडिसिन स्पेशलिस्ट, डेंटिस्ट आणि सर्जन अशी एकत्रित डॉक्टर्सच्या टीमची आवश्यकता असते.
या आजारापासून वाचण्यासाठी काय करता येईल?
ही बुरशी प्रामुख्याने नाकातून तसेच तोंडातून शरीरात प्रवेश करते. त्यामुळे नाक आणि तोंड झाकून ठेवणे म्हणजेच थोडक्यात योग्य पद्धतीच्या मास्कचा वापर करणे फायद्याचे ठरेल. हा आजार कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना होत असल्याने अशा बरे झालेल्या व्यक्तींनी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर द्यावा. बरे झालेल्या व्यक्तींनी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण असेल अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे. शक्यतो फूल बाह्यांचे कपडे घालावेत जेणेकरून रोगप्रतिकार शक्ती कमी असताना ही बुरशी शरीरावर बसून कोणताही अपाय करणार नाही. शरीराची जास्तीतजास्त स्वच्छता ठेवावी.
म्यूकरमायकोसिस हा एकंदर रोगप्रतिकरशक्ती कमी असलेल्या कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर आपल्या कचाट्यात घेत आहे. मुळात आपण कोरोनापासून आधीच स्वतःचे संरक्षण केल्यास म्यूकरमायकोसिसचा धोका निर्माण होणार नाही. सध्या देशात रोज 18 ते 20 नवे म्यूकरमायकोसिसचे रुग्ण आढळत असून ही बाब पुढे जाऊन गंभीर स्वरूपाची होणार नाही याची काळजी आपण स्वतःच घेतली तर पैसा आणि जीव सहज वाचू शकतो.