(राजमुद्रा वृत्तसेवा) सध्याच्या काळात देश हा रामभरोसे चालत असल्याचा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे. देशात पंतप्रधान आहेत, सरकार आहे, प्रशासन आहे, आरोग्य मंत्री आहेत मात्र ज्या पद्धतीने देशामध्ये कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू आता होत आहे, वाराणसीहुन पटना पर्यंत गंगेमध्ये मृतदेह वाहून येत आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार ही होऊ शकत नाहीत. प्रत्यक्ष रामाच्या अयोध्येत सुद्धा कोरोनामुळे बिकट परिस्थिती असताना सबंध देश हा फक्त रामाच्या भरवशावर चालू आहे असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर माध्यमांशी बोलताना केला.
अहंकार आणि राजकारण विसरून जर काम केलं तर ही परिस्थिती नक्कीच सुधारली जाऊ शकते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात चांगली परिस्थिती असून सर्व कामे योग्य पद्धतीने केली जात आहेत. मात्र असे असताना केंद्राकडून म्हणा अथवा विरोधकांकडून म्हणा महाराष्ट्राला सतत बदनाम करण्याचे प्रयत्न केले जातात असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.
देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढायचे असेल तर केंद्र सरकारने देशाचे आरोग्य मंत्री तसेच पंतप्रधान यांनी कोणताही अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेल देशभर लागू करावा. यातून देशाचा फायदा होईल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. या परिस्थितीवर पुढे बोलताना ते म्हणाले की ‘महाराष्ट्र पॅटर्नच सध्या मोठ्या प्रमाणावर विविध स्तरावर कौतुक होत आहे. देशाला आज महाराष्ट्र पॅटर्नची गरज आहे. सध्याचं देशाचं सरकार जागेवर आहे, मात्र त्यांचं अस्तित्व दिसत नाही. अदृश्य राहून काम होत नाहीत. मात्र देशात सध्या फक्त रामभरोसे कारभार चालू असल्याची टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारला निशाणा साधत केली.