(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) अरबी समुद्रात ‘ताऊते’ या चक्रीवादळाच्या निर्मितीला सुरुवात झाली असून तशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या वेगावर वारे वाहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे. येत्या 24 तासात या वादळाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरात किनारपट्टीच्या दिशेने हे वादळ पुढे सरकणार असल्याने कोकण व गोवा किनारपट्टी ला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळाच्या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली असून 15 आणि 16 मे ला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला गेला असून जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत त्यांना परत येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पुढचे 24 तास हे या वादळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून पुढच्या 24 तासात त्याची दिशा कोणत्या बाजूला सरकेल हे सांगता येत नसल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार लक्षद्वीप आणि केरळच्या परिसरात हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे याचे रूपांतर या चक्रीवादळात झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. याची तीव्रता अधिक वाढल्यास तशी 60 किलोमीटर वेगानेही वारे वाहण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.