मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने खडसे आणि कुटुंबियांविरोधात चौकशी सुरू असून, आता प्राथमिकदृष्ट्या पाहता खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करुन दिला, असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असंही कोर्टाने ठणकावून सांगितलं. कोर्टाने असंही म्हटलंय की या गोष्टीकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही, की खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते.
दरम्यान, खडसे यांच्या ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर टाच आणताना ईडीने खडसे यांचा लोणावळा येथील बंगला, जळगाव येथील तीन जमिनी आणि तीन फ्लॅट जप्त केले आहेत. तसेच, बँकेतील ८६ लाखांच्या ठेवीसुद्धा गोठविल्या आहेत.