(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) मुंबई महापालिकेने आज एक अजब निर्णय घेतला आहे. आज आणि उद्या म्हणजे 15 आणि 16 मे रोजी मुंबईत कोरोना लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांच्या सुविधेसाठी आज आणि उद्या मुंबईत चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसापासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याची चिन्हे दिसत होती. काल या चक्रीवादळाच्या निर्मिती प्रक्रियाला सुरुवात होऊन हे वादळ मुंबई आणि गोवा किनारपट्टीकडे सरकू लागले आहे. परिणामी ही 24 तास मुंबई आणि गोव्यासाठी महत्त्वाचे असून सुमारे 40 ते 60 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मुंबई महापालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.
वादळाची तीव्रता ओसरल्यावर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आलेली आहे. चक्रीवादळाची तीव्रता ओसरेपर्यंत नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.