जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज अचानक भाजप नेते गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गुलाबराव पाटील या पूरग्रस्त भागाची आज पाहणी करत आहेत. या पाहणीसाठी जामनेरमध्ये आले असता पाटील यांनी थेट गिरीश महाजन यांचे घर गाठले. यावेळी महाजन यांनीही पाटील यांचं हसतमुखाने स्वागत केलं. पाटील यांनी महाजन यांच्या घरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दोघांनीही एकत्रं अल्पोपहार घेतला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये गप्पाही झाल्या. त्यानंतर दोन्ही नेते एकाच वाहनाने जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पुढे गेले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल, असा दावा भाजपकडून सातत्याने केला जात असताना आज गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांची जाहीर भेट झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
दोन तीन दिवसांपूर्वी वादळ आलं होतं. त्यामध्ये जवळपास चार हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. तसेच तीनशेहून अधिक घरांवरील छप्पर उडून गेल्याचा अंदाज आहे. बाकीचे पंचनामे सुरू आहे, केळी, कापूस आणि मका या सर्व पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या नुकसान दौऱ्यात आम्ही सर्व पक्षाचे नेते एकत्र आले असून आम्ही पाहणी करत आहोत. सरकार म्हणून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करू. काही भागात मदत आली आहे. परंतु, काल परवाच्या वादळाचीही मदत लवकर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं पाटील यांनी सांगितलं.