नागपूर राजमुद्रा वृत्तसेवा | मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ मंडळात आज सकाळी पोलिसांच्या कडक निर्बंधांमुळे आधी श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाला. त्यानंतर पोलिसांनी पत्रकारांना आरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘राज्य सरकारकडून माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे’, असं फडणवीस म्हणाले.
‘माध्यमं आपलं काम करत होते. जास्त गर्दी नव्हती. त्यांच्याकडे पासेस होते. अशावेळी त्यांना मारहाण, धक्काबुक्की करणं योग्य नाही. माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे. मागील दोन वर्षांपासून असे प्रकार सुरु आहेत. इतकी दंडुकेशाही योग्य नाही. याची दखल सरकारने घेतली पाहिजे. कारवाई तर झालीच पाहिजे पण अशाप्रकारे दंडुकेशाहीच्या जोरावर जर आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असू तर ते काही योग्य नाही. अतिशय चुकीचं हे वर्तन आहे आणि याबाबत कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. त्याचबरोबर ‘मागील दोन वर्षांपासून आपण पाहत आहोत. माध्यमांवर एकप्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. कधी गुन्हे दाखल करायचे, कधी कुणाला अटक करायची, कुणावर अन्य प्रकारच्या कारवाया करायच्या, एकप्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. माध्यमांवर प्रचंड दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे’, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केलाय.
नेमकं काय घडलं ?
लालबाग गणेश मंडळातील लोकांना आणि पत्रकारांना पास देण्यात आले आहे. पण, पास दाखवूनही पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला धक्काबुक्की केली. तसेच, पत्रकारांनी हात लावू नका असे म्हटल्यावर, ”हात काय, पाय पण लावेन”, अशी गुंडगिरीची भाषा वापरली. त्या वृत्त वाहिनीच्या पत्रकाराशिवाय इतर पत्रकारांनाही बॅरिकेडच्या बाहेर काढण्यात आले. यावेळीही निकम यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.