(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) मराठा आरक्षणाला घेऊन सध्या राज्यभरात विविध घडामोडी घडत येताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेलचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद साबळे यांनी आज (ता 15) मोठे वक्तव्य केले आहे. राज्य सरकारने जबाबदारी घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं, अन्यथा अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पनवेलचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद साबळे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करत मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांना जाब विचारावा, अशोक चव्हाण ही चुकीची माहिती देत काहीही व्यक्तव्य करतात, स्वतःवरची जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलून देतात, मात्र हे चालणार नाही. अशोक चव्हाण आता उघडे पडले आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना जाब विचारून कारवाई करावी अशी मागणी साबळे यांनी केली आहे.
न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतचा मुद्दा रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वाद होत आहेत. बीडमध्ये ‘लॉकडाउन असतानाही मोर्चा काढला जाईल’ असा सूर निघत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आता कोणत्या टोकाला पोहोचणार हे बघण्यासारखे राहील.