जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकत्र येतात तेव्हा मात्र चर्चेला उधाण येतं. शिवसेना नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी एकत्रितपणे जामनेर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. जामनेर येथे माझ्या घरी या. चहापाणी घेऊन आपण एकत्रच पाहणी करण्यासाठी जाऊ, असे महाजन म्हणाले.
माजी जलसंपदा मंत्री महाजन यांचा जामनेर मतदार संघ आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांना त्याचा फटका बसला, यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची आमदार महाजन व पालकमंत्री पाटील यांनी एकत्रित पाहणी केली. यापूर्वी जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह माजी मंत्री एकनाथ खडसे एकत्र आले होते. दरम्यान, जिल्हा बँकेवरील खडसे यांचे वर्चस्व कमी करण्यासाठीच महाजन-पाटील यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चा आहे.
याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, अतिवृष्टीमुळे जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जामनेर हा आमदार गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. शेतकरी व सर्वसामन्य नागरिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तसेच त्यांना मदत करण्यासाठी राजकारण कशाला हवे आहे. त्यामुळे आपणच त्यांना पाहणीसाठी सोबत येण्याचे सांगितले, त्यानुसार त्यांनी मान्य केले आणि आम्ही संयुक्तरित्या पाहणी केली. आता त्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.
आमदार गिरीश महाजन म्हणाले की, जामनेर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी आपण करीत आहोत. आपण पाहणीही केली आहे. त्यामुळे तुम्हीही सोबत यावे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपणास सांगितले. आपणही ते मान्य केले. त्यांना आपण जामनेर येथे माझ्या घरी या. चहापाणी घेऊन आपण एकत्रच पाहणी करण्यासाठी जाऊ, असे मी गुलाबराव पाटील यांना सांगितले. त्यांनीही ते मान्य केले. त्यानुसार ते आज (ता. १० सप्टेंबर) ते घरी आले. त्यानंतर आम्ही एकत्रच पूरग्रस्त भागाची पाहणी केली. आपत्तीच्या वेळी कसले आलेय राजकारण? जनतेला यातून बाहेर काढणे, हेच ध्येय असते. त्यांना सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असेही महाजन यांनी सांगितले.