जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी कालच आपल्या पदाचा राजीनामा दिला. याचे आज अतिशय संतप्त पडसाद उमटले. आज १२ फ्रंटल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता अंतर्गत वादातून राष्ट्रवादीला जळगावात धक्के बसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपला राजीनामा काल अचानक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविल्याने खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती घेतली असता पाटील यांची पक्षाने प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. एका व्यक्तीकडे दोन पदे ठेवता येत नाहीत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा हे प्रदेशकडून सूचित करण्यात येत होते. त्यांना महानगराच्या अध्यक्ष पदावर ठेवावे, अशी मागणीही काही नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र, त्याबाबत वरिष्ठ नेत्यांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने अखेर वैतागून अभिषेक पाटील यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच, स्थानिक नेत्यांच्या तक्रारीमुळे आपल्याला काम करता येत नाही, असाही आरोप पाटील यांनी केला होता.
अभिषेक पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आज पक्षाच्या बारा फ्रंटल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. यामध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पना पाटील, युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे, पदवीधर विभागाचे अध्यक्ष अनिल पाटील, सचिव अॅड. कृणाल पवार, युवक कार्याध्यक्ष अक्षय वंजारी, युवती अध्यक्ष आरोही नेवे, वक्ता सेलचे अध्यक्ष रमेश भोळे, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष गौरव लवंगरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष कौशल काकर, शिक्षक आघाडीचे प्रमुख हेमंत सोनार यांचा समावेश आहे.
जळगाव महानगराचे अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपण विधानसभा निवडणुकीपासून जळगाव शहरात चांगले काम करीत आहोत. आपले काय चुकले, हे न सांगता आपली प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. काम करणाऱ्या व्यक्तीस स्थानिक काही नेत्यांच्या तक्रारीवरून असे होत असेल तर हे चुकीचे आहे. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे.